इस्लामपूर मतदार संघामध्ये उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याअगोदर निशिकांत पाटील यांना भाजपाच्या गोटातून उमेदवारी मिळणार अशी चिन्हे होती. पण वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयात निशिकांत पाटील यांनी वेळ साधून घड्याळ हातात घेतले आणि कामाला लागले आहेत. महायुतीच्या माध्यमातून निशिकांत पाटील यांनी घड्याळ हातात बांधले. इस्लामपूर शहरात त्यांचे स्वागत झाले. मतदारसंघातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत निशिकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. तोपर्यंत हुतात्मा गटाचे गौरव नाईकवडी यांनी नाराजीचा सूर लावला.
एकनिष्ठतेचे विश्लेषण देत गौरव नायकवडी यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून इथून पुढचा निर्णय घेऊ असे जाहीर केले. इकडे जयंत पाटील यांच्या गटाने तुतारी वाजवत जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. जयंत पाटील यांना लाखाहून अधिक मतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खंबीर मनसुबे त्यांच्या गटांच्या कार्यकर्त्यांनी बांधलेले आहेत.
इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन अजित पवार यांनी जयंत पाटलांच्या विरोधात त्यांना घेण्यासाठीचा एक नवा डावच टाकलेला आहे. मात्र इथून पाठीमागचा इस्लामपूर मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला तर जयंत पाटील यांच्या विरोधकांच्यात कधीच एकी नसल्याचे ग्रहण कायम दिसून आले. जयंत पाटील यांनी आपल्या चाणाक्षवृत्तीने विरोधकांच्या किरकोळ एकीचे फुगे जाता जाता फोडलेत आणि विजय खेचला आहे.
जयंत पाटील यांच्या राज्यभर चाललेल्या तुफानी प्रचाराच्या रथाला रोखण्यासाठी अजित पवार गटाला इस्लामपूर मतदारसंघात धुमधडाका करावा लागणार आहे त्यात त्यांना कितपत यश येते हे आगामी काळात पहावे लागणार आहे.