जयंत पाटलांमध्ये धमक आहे का? सरकारविरोधात लढायची – गोपीचंद पडळकर

जत विधानसभा मतदारसंघातुन भाजपकडून आमदार झालेल्या आणि आटपाडी तालुक्यातील सुपूत्र असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांची आटपाडीत भव्य मिरवणूक आणि सत्कार सन्मान सोहळा पार पडला. महाविकास आघाडीतील कोणात्याच नेत्यामध्ये आता महायुती सरकार विरोधात लढायची हिंमत नाही, असं विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. तसेच सांगली जिल्ह्याचे नेते जयंत पाटील आहेत, त्यांच्यात हिंमत आहे का ? सरकार विरोधात लढायची ? असा सवाल करत लढणं हे रक्तात असावे लागते, हे लोक लगेच वळचणीला पळतात, त्यामुळे हे लढूचं शकत नाही, अशी टीका देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

आता आपण चिंता करायची नाही, वळचणीला कोण जात असतात, साप, उंदीर. पण वाघ कोणाच्या वळचणीला जात नाही, असा टोला देखील पडळकरांनी लगावला. ते सांगलीच्या आटपाडी येथे आयोजित सत्कार सोहळ्यादरम्यान बोलत होते.अडीच वर्ष जयंत पाटील हे सांगलीचे पालकमंत्री होते, पण जिल्हा नियोजन बैठकीला येण्याआधी, मी येणार आहे का नाही, हे माझ्या आमदार मित्राला फोन करून विचारायचे, असा गौप्यस्फोट भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

तर कोणाला यायचं ते येऊ दे, जयंत पाटील येणार आहेत, म्हणतात येऊ द्या आपल्याला काय करायचे आहे. पालकमंत्री होणार आहेत म्हणतात, मग काय घर काढणार का ? त्यामुळे आपण कोणा येतंय, याचा विचार करायचा नाही, आपले पण दिवस येतात, ते आलेत, हे एन्जॉय करा, असं मत यावेळी आमदार पडळकर यांनी व्यक्त केले.