शेळके – चाळके यांचा महाआघाडीचे उमेदवार कारंडे यांना पाठिंबा!……

भाजपाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके हे अपक्ष निवडणुकीच्या तयारीत असताना रविवारी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना त्यांनी जाहीर पाठींबा दिला. शेळके यांनी पाठिंबा दिल्यामुळे कारंडे यांना आणखीन बळ मिळणार आहे. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक अजितमामा जाधव यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते मंडळींची उपस्थिती होती.भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांना भाजपामध्ये घेऊन त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी दिल्याने हिंदुराव शेळके यांनी बंड केले होते.

आवाडे विरोधक म्हणून इचलकरंजी शहराला परिचित असलेले शेळके हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची भूमिका जाहीर केली होती. शेळके यांनी दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच रविवारी त्यांनी आपण महाविकास आघाडी सोबत असून महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

यावेळी सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, उदयसिंग पाटील, नितीन कोकणे,मलकारी लवटे, तमन्ना कोटगी, बाळासाहेब मोहिते, प्रमोद पाटील, अतुल शेळके, मदन जाधव, राजवर्धन नाईक आदी उपस्थित होते. दोन तपानंतर कट्टर राजकीय विरोधक असलेले हिंदुराव शेळके आणि मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले.

प्रस्थापित आवाडे यांना निवडणुकीत पराभूत करण्याच्या उद्देशाने दोघे एकत्र येत राजकीय कटुता संपवली. तसेच आगामी काळात हातात हात घालून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मदन कारंडे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शहरातील दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्याने कारंडे यांची आगामी निवडणुक सुकर होण्यास मदत होणार आहे.