शिरोळ तालुक्यात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून झालेल्या रस्सीखेचच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीची घोषणा केली.यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे संकेत मिळत आहेत.
महाविकास आघाडीतून दत्त उद्योगसमूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. उल्हास पाटील आणि गणपतराव पाटील यांच्यात महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी रस्सीखेच सुरू होती, परंतु गणपतराव पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतरही कार्यकर्त्यांच्या आग्रहावर उल्हास पाटील यांनी अपक्ष अर्ज भरून आघाडीसाठी अडचण निर्माण केली आहे. साध्या पद्धतीने आणि मोजक्या कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल करताना पाटील यांनी स्पष्ट केले की, “समोर कोणीही असो, मला काही फरक पडत नाही; कार्यकर्त्यांच्या आग्रहावर मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.