हातकणंगले तहसीलदार कार्यालयाचा परिसर सोमवारी दिवसभर कार्यकर्त्यांनी गजबजला! हातकणंगलेतून दहा उमेदवारी अर्ज दाखल….

हातकणंगले विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या तीन उमेदवारासह नऊ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यात गणेश विलास वायकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अशोक कोंडीराम माने यांनी जनसुराज्य शक्ती पक्ष, वैभव शंकर कांबळे यांनी स्वाभिमानी पक्षाकडून, अर्ज दाखल केले तर माजी आमदार सुजीत वसंत मिणचेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

तसेच प्रदीप भीमसेन कांबळे, इंद्रजीत अप्पासो कांबळे, नीता अभिजीत माने, अशोक तुकाराम माने, प्रगती रवींद्र चव्हाण, गणेश विलास वायकर, प्रगती विलास चव्हाण यांनी हातकणंगलेचे निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांच्याकडे सोमवारी अर्ज दाखल केले.

शनिवार व रविवार या दोन दिवस सुट्टीनंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हातकणंगले तहसीलदार कार्यालयामध्ये अनेक पक्षांच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे गणेश वाईकर हे चार चाकी गाड्यांचा ताफा घेऊन अर्ज भरण्यासाठी आले.

तर जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे अशोक माने यांनी मोठी रॅली काढुन मोठे शक्ती प्रदर्शन करत आम. विनय कोरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या समवेत अर्ज भरला. तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर येऊन जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांचा अर्ज दाखल केला. त्यामुळे सोमवारी दिवसभर हातकणंगले तहसीलदार कार्यालयाचा परिसर कार्यकर्त्यांनी गजबजून गेला होता.