मित्रपक्षांविरोधातच थोपटले दंड!

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातून महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचित, एमआयएम या प्रमुख पक्षाच्या अधिकृत उमेदवारांंचाही त्यात समावेश आहे.पण सोलापूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.

विशेषतः महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी चार मतदारसंघात, तर महायुतीमध्ये दोन पक्षांनी तीन मतदारसंघात एकमेकांना आव्हान दिले आहे, त्यामुळे सोलापुरात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टेन्शन वाढणार आहे.सांगोला मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाला सुटेल, असे मानले जात असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शेकापकडून डॉ. बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे सांगोल्यात महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) विरुद्ध शेकाप असा सामना रंगणार आहे.