इचलकरंजीत बोनस हाती मिळाल्याने खरेदीला उधाण

इचलकरंजी औद्योगिक शहरामध्ये दोन दिवसांमध्ये यंत्रमाग कामगार, सायझिंग, कामगार, जॉबर, घडीवाले, वहिफणीवाले, कांडीवाले अशा वस्त्रोद्योगाशी निगडीत कामगारांना जवळपास ९० कोटी रूपयापेक्षा अधिक बोनसचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे खरेदीसाठी झुंबड उडाली असून बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. गत चार-पाच वर्षांमध्ये यंत्रमाग उद्योग अत्यंत खडतर प्रवासातून जात आहे. त्यातच रशिया – युक्रेन व इस्त्राईल-पॅलेस्टाईन- लेबनॉन युध्दामुळे वस्त्रोद्योगामध्ये जागतिक मंदीचे वातावरण आहे. सततच्या तेजीमंदीच्या खेळामुळे वस्त्रसाखळी अडचणीत सापडली आहे. यामुळे कापडाची निर्यात कमी झालेली आहे.

देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कापडाला मागणी चांगली राहिल्यामुळे याही वर्षी यंत्रमागधारक व कामगारांचे नाते पुन्हा एकदा घट्ट झालेले आहे. यावर्षी आणखीन एक गोष्ट चांगली घडली. महाराष्ट्र सरकारने नविन वस्त्रोद्योग धोरण जाहिर केलेले आहे. त्याचबरोबर १ एप्रिल पासून २७ एच.पी. खालील म्हणजे साध्या यंत्रमागाला १ रूपयांची प्रति युनिट अतिरिक्त सवलत दिली आहे. तर २७ एच. पी. वरील यंत्रमाग ग्राहकांना ७५ पैशांची सवलत दिलेली आहे. यामुळे फक्त इचलकरंजी शहरामध्ये वर्षाला ११० कोटींची लाईट बिलामध्ये बचत होणार आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणून रॅपिअर, एअरजेट कारखानदारांनी ८.३३ टक्के इतका बोनस दिलेला आहे.

तर साध्या मागाच्या कारखानदारांनी आपल्या कामगारांना १६.३३ टक्का इतका बोनस वाटप केलेला आहे. यामुळे इचलकरंजी शहरामध्ये दिवाळी धुमधड्याक्यात साजरी होण्याचा मार्ग दिसून येत आहे. बोनस हातात पडल्यानंतर खरेदीला उधाण आले आहे. इचलकरंजीमध्ये बाजारपेठ सजलेली आहे. सर्वदूर दिवाळीचा झगमगाट दिसत आहे. असे दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माहिती दिली आहे.