सोशल मीडियावर उमेदवार शांत पण कार्यकर्ते आक्रमक; कार्यकर्तेच एकमेकांना भेटण्याची भीती…..

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याची काल शेवटची तारीख होती. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी नेते मंडळींची घाई गडबड सुरू होती. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार शांत पण अतिउत्साही पदाधिकारी व कार्यकर्तेच आक्रमक झाल्याचे सोशल मीडियावर पहावयास मिळत आहे.

सध्या अर्ज भरण्याचा कालावधी संपलेला आहे 20 नोव्हेंबर ला मतदान व 23 नोव्हेंबरला निकाल लागणार असून आतापासूनच गुलाल आमचाच अशा पोस्ट सोशल मीडियावर पडत आहेत. यामुळे वातावरणात थंडी असली तरी सोशल मीडिया मात्र चांगलाच तापलेला दिसून येत आहे.

सोशल वॉरमुळे दिवाळीच्या आधीच राजकीय फटाके उडताना पहावयास मिळत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट पडल्याने राजकीय आखाड्यात उमेदवार भिडण्याआधीच कार्यकर्तेच एकमेकांना भिडणार नाहीत ना अशी भीती निर्माण झालेली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक करण्याचे आवाहन केले असले तरी नेत्यांच्या अतिप्रेमापोटी कार्यकर्ते व पदाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.