सांगोला तालुक्यात दोस्तीतच रंगणार राजकीय कुस्ती…….

शेकापच्या देशमुखांसह दोन्ही शिवसेनेच्या तालुक्यातील दोन प्रमुख पाटलांनी शड्डू ठोकल्यामुळे तालुक्यातील राजकारणात यंदा तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सांगोला तालुक्यात प्रथमच राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील एकत्रित राजकारण करीत होते. तालुक्यातील राजकारण असो वा तालुक्याच्या विकासाच्या कामासंदर्भात दोघेही एकत्रित जात प्रयत्न करताना दिसून येत होते. कोणत्याही कार्यक्रमाला ते एकत्रितच जात-येत होते.

परंतु या निवडणुकीमध्ये माजी आमदार शहाजी पाटील यांनी शिवसेनेकडून (ठाकरे गट) उमेदवारी मिळवत अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत काही वर्षापासून एकत्रित असलेले दोन्ही दोस्त एकमेकांच्या विरोधात राजकीय शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. परंतु दोघांच्याही कार्यकर्त्यांना अजून दोन्ही नेते एकत्रित येतील अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करीत आहेत. परंतु दोन्ही आजी-माजी नेत्यांनी दोन्ही शिवसेनेचे दोन टोक गाटल्याने एकत्रित येणे कठीण बनले आहे.