आमदारकीच्या रणधुमाळीला मंगळवारी चांगलीच धार आली. अर्ज दाखल करण्याच्या या शेवटच्या दिवशी जिल्हाभर राजकीय धुरळा उठला. अनेक मतदारसंघांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. शेकडोंची रॅली, डोक्यावर पक्षाच्या टोप्या, हातात नेत्यांचे बॅनर, खिशाला बिल्ले आणि तोंडात नेत्यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी जिल्हा तापला होता.अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत 4 नोव्हेंबरअखेर आहे. या दिवसापर्यंत आता आरोप-प्रत्यारोपांची धग आणखी वाढत जाणार आहे.
जितकी काही राजकीय ताकद आहे, ती सर्वच्या सर्व पणाला लावायचा मंगळवारचा दिवस होता; कारण अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस होता. प्रत्येक मतदारसंघात धुसफुशीचे वातावरण होते. रॅली, नंतर सभा आणि अर्ज भरणे यामुळे वातावरण तापले होते. सभेत आरोपांवर आरोप झाले. एकमेकांची उणीदुणी काढली गेली. सर्व पक्षांचे अधिकृत उमेदवार विरुध्द विरोधक या सूत्रात बंडखोरी करणार्या उमेदवारांनीही वातावरण तापवले.उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली जिल्ह्यात होते.
ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील यांच्या तासगाव आणि आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यांनी दोन्ही ठिकाणच्या सभांत जोरदार हल्लाबोल केला. तासगाव येथे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामधून आपल्या गटाचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार सभेत तर त्यांनी धुरळाच उठवला. माझ्यावर 70 हजार कोटींच्या आरोपामध्ये खुली चौकशी करण्याचे आदेश खुद्द आर. आर. पाटील यांनी दिल्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगून राजकीय बॉम्बस्फोट केला. याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटणार, यात शंका नाही.
हीच तोफ अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातही धडाडत ठेवली. काँग्रेसच्या 69 आणि राष्ट्रवादीच्या 71 जागा असूनही मुख्यमंत्रीपद घेता आले नव्हते, मग आता कसे घेणार? असा जाहीर सवाल करून त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री जयंत पाटील’ या टॅगलाईनवर सणकून टीका केली. जयंत पाटील यांचे थेट नाव न घेता त्यांनी आरोपांवर आरोप केले. करेक्ट कार्यक्रम करता म्हणजे कसला कार्यक्रम करता, असा सवाल करत तोफ डागली.