लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्यातील काही बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो अशी चर्चा आहे. यात खासदार नवनीत राणा यांच्या नावाचीही चर्चा आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. महायुतीतील जागावाटपावर बच्चू कडू यांनी भाष्य केलंय. तसंच वंचित आघाडी ही महाविकास आघाडीत सामील होऊ शकते. तशी चर्चा सध्या सुरू आहे. यावर बच्चू कडूनी प्रतिक्रिया दिली आहे.
हाती झेंडा घेतला म्हणजेच भाजपच होतो असं नाही. नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे. आधी नवनीत राणा या हिरवा, भगवा आणि निळा झेंडा घेऊन लढत होत्या. आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरतात. हिंदू शेरणी झाल्या आहेत. भाजप हे आता नवनीत आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष संपवणार आहे. भाजपमध्ये जाऊन त्यांचा स्वाभिमान संपवला नाही पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी स्वतंत्र लढत असेल म्हणून ते महाविकास आघाडीच्या बैठकीला जात नसतील, असं बच्चू कडू म्हणाले. प्रहारचा मुख्यमंत्री झाल्यावर व्यवस्था बदलणार आहे. आमच्या मतदारसंघात सव्वा लाख लोकांना पगार देतोय, असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला.