रूपनर कुटुंब आणि फॅबटेक परिवाराचा दिपकआबांना पाठिंबा

मेडशिंगी येथील रुपनर कुटुंबीयांचे सांगोला तालुक्यातील राजकारणात मोठे प्रस्थ आहे. फॅबटेक परिवाराच्या माध्यमातून रुपनर कुटुंबीयांनी सांगोला तालुक्यात औद्योगिक क्रांती केली आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात हजारो हातांना काम देऊन रुपनर कुटुंबीयांनी सांगोला तालुक्याची महाराष्ट्राच्या नकाशावर वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

फॅबटेक कॉलेज येथे माजी सरपंच संजय नाना रुपनर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून संपूर्ण रुपनर कुटुंबीय आणि फॅबटेक परिवार दिपकआबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे अभिवचन दिले यावेळी रुपनर कुटुंबीय आणि फॅबटेक परिवारातील सदस्य उपस्थित होते. गेली ३० ते ३५ वर्ष राजकीय आणि सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे सांगोला तालुक्याचे लोकप्रिय नेतृत्व दिपकआबा साळुंखे पाटील आणि मेडशिंगी येथील रुपनर परिवाराचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

साळुंखे पाटील आणि रुपनर या दोन्ही परिवाराने राजकारणाच्या पलीकडे नेहमीच नाती जपण्याला प्राधान्य दिले. आज आमच्याच परिवारातील दिपकआबा साळुंखे पाटील हे महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संपूर्ण रुपनर कुटुंबीय आणि फॅबटेक परिवार दिपकआबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा निर्धार फॅबटेक ग्रुपचे विश्वस्त आणि मेडशिंगी गावचे माजी सरपंच संजयनाना रुपनर यांनी केला.

यावेळी बोलताना माजी सरपंच संजय नाना रुपनर म्हणाले, जवळा येथील साळुंखे पाटील परिवार आणि मेडशिंगी येथील रुपनर परिवाराने कधीच राजकारणात स्वार्थ पाहिला नाही. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करणे हाच धर्म मानून दोन्ही परिवाराने सांगोला तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात आपले प्रामाणिकपणे योगदान दिले आहे. आज आमच्याच परिवारातील दिपकआबा महाविकास आघाडी कडून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

आपल्या परिवारातील व्यक्ती मैदानात उतरल्यानंतर त्यांच्या पाठीशी संपूर्ण परिवाराने उभे राहणे हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे याची जाणीव ठेवून आम्ही संपूर्ण रुपनर कुटुंबीयांनी आणि फॅबटेक परिवाराने दिपकआबा साळुंखे पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. दिपकआबांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याचा आम्ही निर्धार केला असून दिपकआबांच्या कार्याची मशाल घरोघरी पोहोचवण्यासाठी रुपनर कुटुंबासह फॅबटेक परिवार सज्ज असल्याचेही शेवटी संजयनाना रुपनर यांनी सांगितले.