खानापूर मतदारसंघात चर्चांना उधाण! पडळकर गटाचा पाठिंबा कोणाला?

खानापूर महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना काही महिन्यांपूर्वी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता आटपाडीतील राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या बंडामुळे प्रचंड चुरशीची झाली आहे. या निवडणुकीत महायुतीतील आमदार पडळकर यांचा गट आता कोणाला पाठिंबा देणार? याची मतदारसंघाला उत्सुकता लागून आहे. सांगली जिल्ह्यात महायुतीच्या वतीने खानापूर मतदार संघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर रिंगणात आहेत. स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर सुहास बाबर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर त्यांचे विरोधक माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील हे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षातून पहिल्यांदाच विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत.

खानापूर मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेले माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. देशमुख आणि पडळकर यांचे अर्ज माघारी निघतील आणि मतदारसंघात दुरंगी लढत होईल असे राजकीय तज्ञांचे मत होते. ब्रह्मानंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. मात्र भाजप सोडून अवघ्या आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला. महाविकास आघाडीतील बंडखोरी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना अपयश आले आहे. तर महायुतीत देखील शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये देखील समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.

सुरुवातीला कोणत्याही प्रकारच्या चर्चेत नसलेले राजेंद्र अण्णा देशमुख आता आटपाडीच्या अस्मितेच्या मुद्दयावरून तालुक्यातून रान तापवत आहेत. माजी आमदार राजेंद्र देशमुख यांना आटपाडी तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.मतदार संघातील प्रमुख उमेदवार सुहास बाबर आणि वैभव पाटील यांच्यात आता राजेंद्र अण्णा देशमुख यांची भर पडल्यामुळे राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे. सुहास बाबर आणि वैभव पाटील यांचे संपूर्ण खानापूर मतदारसंघात स्वतःचे गट आहेत.

मात्र राजेंद्र देशमुख यांचा आटपाडी सोडता खानापूर किंवा विसापूर सर्कलमध्ये गट अस्तित्वात नाही. खानापूर मतदारसंघात राजेंद्र देशमुख यांच्या उमेदवारीमुळे कार्यकत्यांचा गोंधळ उडाला आहे. राजेंद्र अण्णांची उमेदवारी सुहास बाबर यांना फायद्याची ठरणार की वैभव पाटील यांना फायद्याची ठरणार ? की आटपाडीच्या अस्मितेचा विषय समोर आणून राजेंद्र अण्णा बाजी मारणार ? यावरून आता मतदारसंघात चर्चा सुरू आहेत.