अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. रस्त्यांमध्ये खड्डे पडल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच अनेक भागातील बसस्थानक देखील दुरावस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. सांगली येथील मुख्य बसस्थानकासमोरील प्लॅटफॉर्म आणि परिसराचे बांधकाम व काँक्रिटीकरण सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असल्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत.
यासाठी सुमारे तीन कोटी रुपये औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर करण्यात आले असून, येत्या पंधरवड्यात पुढील बारा प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील सात बस स्थानकांमध्ये काँक्रिटीकरणाचे काम एकाचवेळी सुरू करण्यात आले आहे. यासाठी अकरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सप्टेंबर 2024 मध्ये याच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला. याला चार महिन्यांचा कालावधी उलटला तरी याचे काम पूर्ण झालेले नाही. सांगलीच्या बसस्थानक परिसराची दुरवस्था झाली होती. बसेस लावण्याच्या परिसरात मोठे खड्डे पडले होते. याबाबत बस प्रशासनाकडून अनेकवेळा प्रस्ताव पाठवल्यानंतर सातही बस स्थानकांसाठी अकरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
सांगलीच्या बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण 10 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात पश्चिम बाजूच्या बसस्थानक मैदानाचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात येत आहे. यासाठी सुमारे दीड फूट खड्डा खणण्यात आला आहे. सुमारे फूटभर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
सांगलीबरोबर जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, विटा, इस्लामपूर आणि शिराळा बसस्थानकांच्या संपूर्ण परिसराचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. यासाठी अकरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सांगली सोडून इतर बसस्थानकांचे काम जवळपास 50 टक्के पूर्ण झाले आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी 25 वर्षांपर्यंत सुस्थितीत राहणार आहे.
