मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या कमरेपर्यंत; गाभारा उजळला

क्षितिजरेषे पल्याड जाणार्‍या सूर्यास्ताच्या किरणांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या गाभार्‍यात प्रवेश करत मूर्तीच्या कमरेला स्पर्श केला. किरणोत्सव होताच दिवे मालवलेला गाभारा उजळून गेला.किरणोत्सवाची पूर्तता झाल्यानंतर अंबाबाईची आरती करण्यात आली. यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या शेकडो भाविकांनी किरणोत्सवाचा सोहळा डोळ्यात साठवत अंबाबाईचे दर्शन घेतले.

दरम्यान आज शुक्रवारपासून अंबाबाई मंदिरातील पाच दिवसांच्या किरणोत्सवाला प्रारंभ झाला.स्थापत्यकलेचा अजोड नमुना असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अंबाबाई मंदिरात वर्षातून दोन वेळा दक्षिणायन व उत्तरायण काळात किरणोत्सव सोहळा होतो. यावेळी मावळतीची किरणे थेट अंबाबाईच्या मूर्तीच्या चरणांवर, कमरेवर व मुखावर पडतात. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो भाविकांची गर्दी होते.

शुक्रवारपासून दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली.सायंकाळी चार वाजून 47 मिनिटांनी मावळतीच्या किरणांनी गरुड मंडपाच्या कमानीत प्रवेश केला. त्यानंतर 5 वाजून 13 मिनिटांनी किरणे मुखदर्शनाच्या जिन्यावरून गणपती चौकाकडे आली. पुढच्या दहाव्या मिनिटाला किरणे गणपती चौकात पोहोचली. यावेळी दिवे मालवण्यात आले. 5 वाजून 34 मिनिटांनी चांदीचा उंबरा ओलांडून किरणे गाभार्‍यात आली तेव्हा पाच वाजून 39 मिनिटे झाली होती.

कटांजनावरून पुढे सरकत किरणांनी 5 वाजून 43 मिनिटांनी अंबाबाईला चरणस्पर्श केला; तर प्रखर किरणे 5 वाजून 47 मिनिटांनी अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहोचली. काही सेकंदातच किरणे उजवीकडे झुकली. किरणोत्सव सोहळा पूर्ण होताच संपूर्ण मंदिर आवार अंबाबाईच्या जयघोषाने दुमदुमला.