भीमाशंकर साखर कारखाना देशात सर्वात्कृष्ट….

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे २०२२-२३ चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे वसंतदादा पाटील पारितोषिक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लिदत्तात्रयनगर (ता. आंबेगाव, जि. पुणे) कारखान्यास मिळाले आहे.महाराष्ट्राने २१ पैकी एकूण १० पारितोषिके मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकाविला. उत्तर प्रदेशाला चार तर गुजरात, तमिळनाडूने प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली. पंजाब, हरियाना व मध्य प्रदेशाला प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (ता. १०) या पुरस्कारांची नवी दिल्ली येथे घोषणा केली. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे या वेळी उपस्थित होते.
देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यांतील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे पारितोषिके जाहीर केली जातात.
यंदाच्या (२०२२-२३) वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशातून ९२ सहकारी साखर कारखान्यांनी भाग घेतला.

त्यात महाराष्ट्र (३८), उत्तर प्रदेश (११) , गुजरात (११), तमिळनाडू (१०), पंजाब (८), हरियाना (८), कर्नाटक (४) आणि मध्य प्रदेश व उत्तराखंड (प्रत्येकी एक) सहभागी झाले होते. पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ५३ सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता. उर्वरित (सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी उतारा) राज्यांचा दुसरा गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ३९ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला.