अंबाबाईच्या कोल्हापूर भूमीत राहुल गांधी यांना आव्हान देतो की, त्यांनी काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम आणून दाखवावे. त्यांच्या पुढील चार पिढ्या आल्या, तरी पुन्हा ३७० कलम आणू शकणार नाहीत, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले.कोल्हापूर जिल्ह्यासाठी टेक्स्टाइल पार्क मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकामध्ये भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, राहुल आवाडे, महेश जाधव यांची भाषणे झाली. यावेळी आमदार शशिकला जोल्ले, रवींद्र माने, प्रकाश दत्तवाडे, अशोक स्वामी, अमृत भोसले, स्वप्निल आवाडे, आदी उपस्थित होते.शाह म्हणाले, महाराष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने चालावा की, औरंगजेबच्या मार्गाने चालावा हे तुम्हाला निश्चित करायचे आहे. तसेच, शक्तीचा अपमान करणाऱ्यांच्या सोबत आपल्याला जायचे आहे की, आईचा सन्मान करणाऱ्यांसोबत राहायचे, हे निश्चित करावे लागेल. कॉंग्रेसवाल्यांनी ७० वर्षे राम मंदिरचा विषय भिजत ठेवला. मोदी यांनी पाच वर्षांत न्यायालयीन खटला जिंकून भूमिपूजन, मंदिर निर्माण, प्राणप्रतिष्ठापना केली.
व्होट बॅंकेला घाबरून शरद पवार आणि कंपनीनी श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठीही गेले नाहीत. एका बाजूला अर्थव्यवस्था देशाचा विकास याची चर्चा होते, तर दुसऱ्या बाजूला राहुल परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची चर्चा करतात. राहुल कान उघडून ऐका, भाजप आणि एनडीएचा खासदार असेपर्यंत आपणाला एससी, एसटी, ओबीसीच्या आरक्षणाला हात लावू देणार नाही.बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास विरोध केला. राम मंदिराला विरोध, ३७० कलम रद्दला विरोध, वक्फ कायदा, तिहेरी तलाकला विरोध करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले.
राहुल आवाडे व हातकणंगले मतदारसंघाचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांना विजयी केल्यास कोल्हापूर जिल्ह्यासाठी टेक्स्टाइल पार्क आणण्याचे काम नरेंद्र मोदी करतील. कापसाच्या शेतीपासून एक्स्पोर्टपर्यंतची वस्त्रोद्योगाची पूर्ण साखळी कोल्हापूरच्या वेगवेगळ्या तालुक्यांत बनविण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे सरकार करेल. ३७० कलम हटविल्यामुळेच राहुल गांधी काश्मीरमध्ये जाऊन बाइकवर फिरू शकतात. कोल्हापूरसाठी केंद्र सरकारने मोठी रक्कम देऊन अनेक विकासकामे केली आहेत.