भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? 

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तानात होणार असल्याचं प्रस्ताविक वेळापत्रक आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 मार्चला सामना होईल अशी या वेळापत्रकात मांडणी करण्यात आली आहे. पण टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही? यावर सर्वकाही अवलंबून आहे. बीसीसीआयने याबाबत ठोस असं आयसीसीला कळवलं नसल्याने कोंडी झाली आहे. असं असताना स्पर्धेच्या आयोजनाची तारीख जवळ येत असल्याने बीसीसीआयला अखेर आयसीसीसमोर भूमिका मांडावी लागली आहे. बीसीसीआयने भारत सरकारच्या सूचनेचा संदर्भ देत भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचं वृत्त आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने आयसीसीला स्पष्टपणे सांगितलं की, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाऊ शकत नाही. भारतीय संघाल पाकिस्तानात जाण्याची परवानगी भारत सरकारकडून मिळालेली नाही. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर करण्याशिवाय पर्याय नाही असं दिसत आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी या स्पर्धेबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी सांगितलं की, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात येणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. पण आमची भूमिका स्पष्ट आहे. काही अडचण असल्यास बीसीसीआयने आम्हाला लेखी कळवावे. आतापर्यंत आम्ही हायब्रिड मॉडेलबद्दल विचारही केलेला नाही आणि त्यासाठी तयार नाही. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करत आहोत, ही स्पर्धा यशस्वी होईल अशी आम्हाला आशा आहे.’

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेलला परवानगी दिली नाही तर आयसीसी आणि पीसीबी दोघांचं नुकसान होईल. कारण आयसीसीच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी उत्पन्नाचं मुख्य स्त्रोत हे टीम इंडिया आहे. त्यामुळे टीम इंडियाशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करणं हे परवडणारं नाही. त्यामुळे ही स्पर्धा आता हायब्रिड मॉडेलवरच होईल असं दिसत आहे.भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे टीम इंडियाने 2008 च्या आशिया कपपासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. पण पाकिस्तानचा संघ 2023 वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात आला होता.

हायब्रिड मॉडेलवर भारताचे सामने यूएईमध्ये घेण्याचा निर्णय होऊ शकतो. यापूर्वी 2023 मध्ये आशिया चषक देखील हायब्रिड मॉडेलवर आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे होते. त्यामुळे टीम इंडियाचे सामने श्रीलंकेत खेळण्याशिवाय पर्याय नव्हता. या स्पर्धेचा अंतिम सामनाही श्रीलंकेतच झाला होता.