आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. यामध्ये शेळ्या, मेंढ्यांची व माणदेशी खिलार जनावरांची यात्रा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात तीन दिवस भरणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी दिली. पुजारी म्हणाले, श्री उत्तरेश्वर यात्रा उत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे आटपाडी येथे शेळ्या, मेंढ्या व खिलार जनावरांची यात्रा गुरुवारी 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे.
सदर यात्रेमध्ये शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, रेडे, घोडे खरेदी करता बेळगाव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून व दुधेभावी ढालगाव येथून मोठ्या प्रमाणात व्यापारी व शेतकरी खरेदी विक्रीसाठी येणार आहेत. गुरुवारी 14 ते 15 नोव्हेंबर रोजी शेळ्या मेंढ्या विक्री यात्रा, 16 नोव्हेंबर पासून खिलार जनावरांची यात्रा, गुरुवारी 21 नोव्हेंबर रोजी नैवेद्य कार्यक्रम होणार आहे व रथाची भव्य मिरवणूक निघणार आहे. जनावरांची यात्रा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात होणार आहे.