आटपाडी नगरपंचायत पाणी योजनेसाठी ८३.८२ कोटींचा निधी!

आटपाडी नगरपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा योजनेसाठी ८३.८२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.आटपाडी विश्रामगृहावर सुहास बाबर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, अमोल बाबर, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.बाबर म्हणाले, आ. अनिल बाबर यांनी आटपाडी पाणी पुरवठा योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला
होता.

अमरसिंह देशमुख आणि तानाजीराव पाटील यांनी ना हरकत प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची पूर्तता केली. त्यामुळे नगरोत्थान अभियानांतर्गत आटपाडी पाणी पुरवठा योजनेसाठी ८३ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
आ. बाबर यांचे मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न त्यांच्या पश्चात सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करू.
ते म्हणाले, पुढील पंधरा वर्षांची संभाव्य लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेऊन एक परिपूर्ण पाणी पुरवठा
योजना आटपाडी नगरपंचायतीसाठी साकारली जाणार आहे.

आटपाडी तलावातून शहर आणि परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी जुनी पाईपलाईन पूर्णतः बदलून २५४ किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकली जाईल. दोन लाख ५८ हजार लिटरची नवीन पाण्याची टाकी आणि अन्य पाच टाक्यांच्या माध्यमातून आटपाडीकरांना दररोज शुद्ध पाणी
पुरवठा होईल. पाणी पुरवठा पाईपलाईन टाकताना काही ठिकाणी रस्त्याचे नुकसान झाल्यास त्याच्या दुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी १२० केडब्ल्यूपी क्षमतेचा सोलर प्लांट उभारला जाणार आहे.