अनेक भागांमध्ये पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करण्यात आले. या पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाला अनेक भागांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. आटपाडी शहरात गणेश विसर्जनासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून कृत्रिम कुंडाची निर्मिती करण्यात आली.
गणरायाचे विसर्जन कृत्रिम कुंडात करत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. आटपाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते.
त्या अनुषंगाने आटपाडी तलावामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन न करता कृत्रिम कुंडात विसर्जन करावे, असे आवाहन करताना नगरपंचायतीने तलावालगत कृत्रिम कुंड उभारले होते.
विसर्जनासाठी येणाऱ्यांना नागरिकांचे प्रबोधन करत पर्यावरण रक्षणासाठी योगदानाचे आवाहन करण्यात आले. नगरपंचायतीच्या कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जनासाठी नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी शांतीप्रसाद पुंडे, कर निरीक्षक अमरसिंह बंडगर, तसेच वरिष्ठ लिपिक सुधीर भिंगे, सारंग यादव, किशोर मरगळे, आकाश लिंगे व नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विसर्जन कुंडामुळे एक चांगला उपक्रम राबविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.