मंगळवेढा – पंढरपूर विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीकडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून स्वतंत्र उमेदवार जाहीर करून त्यांना एबी फॉर्म दिल्यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली असतानाच काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोलापुरात भेट घेत स्वागत केले.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारास मताधिक्य देण्याचे काम केल्यामुळे विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी भगीरथ भालके यांनी केली होती. मात्र, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याने काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
त्यानंतर दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसने भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांना उमेदवारी दिली. त्यामुळे महाविकास आघाडीने या जागेवर स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उध्दव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुणाचा प्रचार करावा असा प्रश्न उपस्थित केला होता.
सद्यस्थितीला मंगळवेढा शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनिल सावंत यांचा प्रचार सुरू केला आहे. तर तालुकाप्रमुख येताळा भगत यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमीकेकडे लक्ष असतानाच सांगोला येथील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्धव ठाकरे काल सोलापूरात दौऱ्यावर आले होते.
सोलापुरात त्यांची काँग्रेसचे शहर मध्यचे उमेदवार चेतन नरोटे व पंढरपूर मधील काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके, यांनी स्वागत केले. यावेळी दक्षिण सोलापूरचे उमेदवार अमर पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी तुम्ही लढा आणि निवडूनही या ! आमच्या शिवसैनिकांची तुम्हाला खंबीर साथ आणि पाठबळ राहील.
राज्यात महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता निश्चित येणार आहे, अशा शब्दात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.