पंचगंगा स्मशानभूमीतील रक्षाकुंडाची दुरवस्था; नातेवाइकांच्या भावनांशी खेळ, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नाराजी

इचलकरंजी येथील पंचगंगा स्मशानभूमीत पूर्वी दहनविधीनंतर जमा होणारी राख पंचगंगा नदीत टाकली जात होती. त्यामुळे नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दीपस्तंभ युवा मंचच्या माध्यमातून स्मशानभूमीत दोन रक्षाकुंड उभारले. त्यानंतर नागरिकही रक्षा नदीत न टाकता कुंडात विसर्जित करत. मात्र, सध्या दोन्ही रक्षाकुंड खालच्या बाजूने तुटल्याने रक्षा बाहेर पडत असल्याने मृतांच्या नातेवाइकांच्या भावना दुखावल्या जात आहे.

रक्षाकुंडांची दुरवस्था होऊन महापालिकेनेही नवीन रक्षाकुंड न बसविल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.रक्षाकुंडात वर्षभरात १० टनांहून अधिक रक्षा जामा होते. जमा होणारी ही राख महापालिका प्रशासनाकडून खतनिर्मितीसह अन्य उपयोगासाठी वापरली जाते. मात्र, सुरुवातीचा काळ सोडला तर महापालिकेकडून कुंडातील रक्षा अनियमित उचलली जात असल्याने कुंड भरून वाहत होते. सध्या तर काही विघ्नसंतोषी लोकांकडून रक्षाकुंडांची तोडफोड केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्मशानभूमीत दहन होणाऱ्या मृतदेहांची रक्षा उघड्यावरच टाकली जात आहे.