भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेतील तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा बुधवारी 13 नोव्हेंबरला सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क येथे होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ही 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे.
दोन्ही संघांचा हा सेंच्युरियनमधील दुसरा टी 20i सामना असणार आहे.रिपोर्टनुसार, 13 नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये पाऊस होण्याची 8 टक्के शक्यता आहे. तसंच संध्याकाळी आकाश निरभ्र असून मुसळधार पावसाची कोणतीही शक्यता नाही. सेंच्युरियनमध्ये संध्याकाळी 5 ते रात्री 11 दरम्यान पावसाची शक्यता नाही. त्यामुळे सामना निर्विघ्नपणे पार पडण्याची आशा आहे.दरम्यान आतापर्यंत उभयसंघात एकूण 29 टी 20i सामने झाले आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेला 16 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 12 वेळा पलटवार केला आहे.
त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात दोघांपैकी कोण आघाडी घेतं? याकडे साऱ्याचं लक्ष असेल.दरम्यान 6 वर्षांआधी उभयसंघात 2018 साली टी 20i सामना खेळवण्यात आला होता. तेव्हा भारताला पराभूत व्हावं लागलं होतं. तेव्हा दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. तेव्हा हेन्रिक क्लासेन याने 69 धावांची खेळी करत विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
