इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होत आहे. प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे, महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे आणि अपक्ष बंडखोर उमेदवार विठ्ठल चोपडे यांच्यात खरी लढत रंगणार आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये या तिघांमध्ये काटाजोड लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपाचे उमेदवार राहुल आवाडे यांनी प्रारंभ ीच्या काळात प्रचारात आघाडी घेतली असली तरी त्यांना दहा दिवस कायम राखता येणार काय? मदन कारंडे अंतिम टप्प्यात प्रचारात मोसंडी मारणार का? तर अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे कोणती रणनीती आखणार यावरच आगामी दहा दिवसातील प्रचाराची रणनीती आणि मतांची गोळाबेरीज समजणार आहे. महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा, कॉर्नर सभा, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्याचबरोबर मदन कारंडे यांच्या पदयात्रा, कॉर्नर सभा यांना मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे.अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे हे व्यक्तिगत मतदारांच्या गाठीभेठींवर भर देत असून त्यांना महिला पुरुषांसह युवावर्गांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. प्रचारासाठी अद्याप आठ दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यामध्ये कोणता नेता आघाडी घेतो यावरच विजयाचा गुलाल अवलंबून असणार आहे.