इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात फ्रि स्टाईल हाणामारी, ८ जणांवर गुन्हा दाखल

सध्या तर गुन्हेगारी प्रमाणात वाढ झालीच आहे त्याबरोबर अनेक अवैध धंदे राजेरोसपणे सुरु आहेत. तसेच अनेक छोटे छोटे वादविवाद खूप मोठे रूप घेतात. ज्याचा खूपच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. सध्या असाच एक प्रकार इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात घडला आहे. किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या आवारातच फ्रि स्टाईल हाणामारीचा प्रकार घडला. घडलेल्या या घटनेने पोलिसांची मात्र तारांबळा उडाली. या प्रकरणी दोन्ही कुटुंबातील ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस हवालदार सागर कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. नेहरूनगर झोपडपट्टीतील दोन कुटुंबांमध्ये दोन-तीन दिवसांपूर्वी काही कारणावरुन वाद झाला होता. पण हा वाद मिटवण्यात आला होता. परंतु मंगळवारी सकाळी एका मुलाला मारहाण झाली. याची माहिती कळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दोन्ही कुटुंबे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आली. त्याठिकाणी या दोन्ही कुटुंबातील वाद पुन्हा उफाळून आला आणि ठाण्याच्या आवारात फ्री स्टाईल तुंबळ हाणामारी झाली.

पोलीस ठाण्याच्या आवारातच भांडण सुरु झाल्यामुळे पोलिसांची तारांबळा उडाली. पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांना बाजूला करून शांत राहण्यास सांगितले. या प्रकाराने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी दोन्ही कुटुंबातील ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये सुशिला दयानंद दोडमन्नी (वय ५२), माधुरी जितेंद्र दोडमन्नी (वय ३२), जितेंद्र दयानंद दोडमन्नी (वय ३६), दयानंद लक्ष्मण दोडमन्नी (वय ६५ सर्व रा. नेहरुनगर), शबाना मगदुम टकळगी (वय २५), जहीर शमशुद्दीन पठाण (वय ४२), रमेजा सलीम शेख (वय ५० तिघे रा. नेहरुनगर) व बुसेरा जहीर पठाण (वय ३५ रा. गोंधळी गल्ली) यांचा समावेश आहे.