मा.आ.प्रकाश आवाडे व आ.राहुल आवाडेंच्या प्रयत्नास यश! आचार्य 108 श्री विशुध्दसागरजी मुनी महाराज राजकीय अतिथी घोषित

सध्या अनेक भागात विकासकामे जोरदार सुरु आहेत. निधी देखील मंजूर केले जात आहेत. अनेक विविध मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. इचलकरंजी शहरात देखील सध्या विकासकामे सुरु आहेत. जैन समाजातील अत्यंत महनीय व पूजनीय व्यक्तीमत्व असलेले परमपूज्य चर्याशिरोमणी आचार्य 108 श्री विशुध्दसागरजी मुनी महाराज यांना महाराष्ट्र राज्य शासनाने राजकिय अतिथी घोषित केले आहे. शांतता व अहिंसा या गोष्टींचा प्रचार व प्रसार यासाठी परमपूज्य चर्याशिरोमणी आचार्य 108 श्री विशुध्दसागरजी मुनी महाराज महाराष्ट्र राज्याच्या दौर्‍यावर आहेत. यानिमित्ताने त्यांना राजकिय अतिथी घोषित करण्यात आल्याने जैन समाजातून आनंद व्यक्त होत आहे.

या संदर्भात माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी व पाठपुरावा केला होता. परमपूज्य चर्याशिरोमणी आचार्य 108 श्री विशुध्दसागरजी मुनी महाराज हे जैन समाजातील अत्यंत महनीय व्यक्ती आहेत. शांतता आणि अहिंसा या गोष्टींचा प्रचार व प्रसारासाठी ते राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड अशा अनेक राज्यांमधून धार्मिक सद्भावनेसाठी विहार करत आहेत. सध्या त्यांनी कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला आहे.

श्री विशुध्दसागरजी महाराज यांना प्रत्येक राज्यांमध्ये राजकिय अतिथी म्हणून सन्मान मिळाला आहे. अहिंसेचा प्रसार, साहित्य व धार्मिक क्षेत्रात योगदान देणे अशी अनेक कामे या विहारादरम्यान ते करीत आहेत. त्यांचे दर्शन व आशिर्वादसाठी आणि या विहारात सहभागी होण्यासाठी त्यांचेसोबत असंख्य जैन व इतर धर्मिय तसेच परराज्यातील श्रावक-श्राविकांची मोठी गर्दी होत आहेत. महाराष्ट्र राज्य तर संतांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने येथे संतांचा नेहमीच आदर व सन्मान केला जातो.

याच पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात जैन समाजातील महनीय व पुजनीय व्यक्तीचा सन्मान म्हणून राज्य सरकारने परमपूज्य चर्याशिरोमणी आचार्य 108 श्री विशुध्दसागरजी मुनी महाराज यांना राजकिय अतिथी घोषित करावे, अशी मागणी सर्वच जैन धर्मियांच्या वतीने करण्यात आली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्यता देत परमपूज्य चर्याशिरोमणी आचार्य 108 श्री विशुध्दसागरजी मुनी महाराज यांना राजकिय अतिथी घोषित केले आहे.परमपूज्य चर्याशिरोमणी आचार्य 108 श्री विशुध्दसागरजी मुनी महाराज यांचा दौरा उत्तरेच्या दिशेने सुरु असून 25 जानेवारीपासून त्यांची रुकडी येथून पंढपूरच्या दिशेने पदयात्रा सुरु आहे.

1 ते 5 फेब्रुवारी पंढरपूर येथे पंचकल्याणक होईल. त्यानंतर 5 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पंढरपूर ते शिरसाड (मुंबई) अशी अकलुज-नातेपुते-यवत-पुणे-पनवेल-ऐरोली-साकीनाका बोरीवली-गोरेगाव-शिरसाड अशी पदयात्रा निघेल. 28 फेब्रुवारी ते 5 मार्च शिरसाड येथे पंचकल्याणक होईल. त्यानंतर 5 मार्च ते 22 मार्च शिरसाड ते जालना अशी वज्रेश्‍वरी-सिन्नर-वैजापूर-संभाजीनगर-जालना पदयात्रा निघेल. 25 मार्च ते 7 एप्रिल जालना ते पावापुरी (मध्यप्रदेश) अशी जामनेर-भुसावळ-पावापुरी या मार्गे विहार होणार आहे. परमपूज्य चर्याशिरोमणी आचार्य 108 श्री विशुध्दसागरजी मुनी महाराज यांना राजकीय अतिथी घोषित करण्यात आल्याने जैन समाजातून आनंद व्यक्त होत आहे.