इचलकरंजीत राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उद्या सभा

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ गुरुवार, दि. 14 नोव्हेंबर रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची शहापूर गावचावडी चौक येथे दुपारी 4 वाजता जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष पै.अमृत भोसले व प्रकाश दत्तवाडे यांनी दिली.

ते म्हणाले, महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ चारच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या झंझावाती सभेला न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती. विकासकामांच्या बळावर सुज्ञ जनता पुन्हा महायुतीची सत्ता आणेल. त्या दृष्टीने मंत्री गडकरी यांची होणारी जाहीर सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या सभेसाठी खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आवाडे, आ. शशिकला जोल्ले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.