सिन्नरच्या अभिजित विष्णू भालेराव या २१ वर्षीय तरुणाने काश्मीर ते कन्याकुमारी हे ३,८९० किलोमीटर अंतर अवघे २७ दिवस १३ तास १२ मिनिटे आणि १३ सेकंदांत धावत पूर्ण केले. सर्वांत कमी वेळेत त्याने हे अंतर पार केल्याने या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. विशेष म्हणजे हा विक्रम करणारा अभिजित सिन्नरच्या एका खासगी शिक्षण संस्थेत मानधनावर क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आई अलका यांनी मंगळसूत्र गहाण ठेवून अभिजितला विश्वविक्रम करण्याची प्रेरणा दिली.
काश्मीर ते कन्याकुमारी या ‘सोलो रन’मध्ये सर्वांत कमी वेळेत धावण्याचा विश्व विक्रम अभिजितच्या रूपाने महाराष्ट्राच्या नावावर झाला आहे. अभिजितने काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर ३० दिवसांत पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, नियोजित वेळेच्या अगोदर तीन दिवस म्हणजे २७ दिवस १३ तास, १२ मिनिटे आणि १३ सेकंद एवढ्या कमी वेळेत हे अंतर पार करीत विक्रमाला गवसणी घातली. काश्मीरमधील लाल चौकातून ३० एप्रिल रोजी सकाळी सहाला त्याने धावण्यास प्रारंभ केला. त्यानंतर रोज २० तास धावणे आणि केवळ चार तास झोपणे असा दिनक्रम त्याने निश्चित केला. त्याने हे अंतर दिवसाकाठी सरासरी १३० ते १४० किलोमीटर अंतर धावून पार केले. कन्याकुमारी येथे मंगळवारी दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी तो पोहोचला. एक पोलिस कर्मचारी, नातेवाईक नंदकुमार गाडेकर, फिजिओथेरपिस्ट डॉ. तुषार बोरकर, सोशल मीडियावरील मित्र गौरव राजपूत, ओम लांडे, आनंद आहेर हे पाच जण त्याच्या सोबतीला होते.
१७ लाखांचा खर्च
सर्वसामान्य कुटुंबातील अभिजितचे वडील विष्णू भालेराव सुतारकाम करतात. या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी तब्बल १७ लाखांचा खर्च आला. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने मित्रपरिवार आणि तो कार्यरत असलेल्या संजीवनी शाळेसह इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्याला पैशांची मदत केली. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, युवा नेते उदय सांगळे यांचेही या तरुणाला आर्थिक सहाय्य लाभले. त्यातून त्याची विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची मनीषा फळाला आली.
तब्बल ३,८९० किलोमीटरचे अंतर एकाच शूजवर धावणे अशक्य असल्याने १ लाख ३० हजार रुपयांचे ७ बुटांचे जोड अभिजित भालेराव याने खरेदी केले होते. मात्र, सोबतीला असलेल्या गाडीतून बुटाचे जोड असलेली बॅग गहाळ झाली. त्यामुळे बुटाच्या एकाच जोडीच्या साह्याने त्याने हे अंतर पार करून आलेल्या अडथळ्यांवर मात केली.