18 तारखेला प्रचाराचा अवधी संपत असून त्याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरात महायुती आणि मविआच्या नेत्यांनी प्रचाराचा, सभांचा धडाका लावला आहे. प्रचार संपायला काहीच दिवस असून त्यापूर्वी राज्यात ठिकठिकाणी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत. वर्षानुवर्षे कबनूरच्या पाणी प्रश्नाची निव्वळ थट्टाच होत आहे. कबनूरच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाचे राजकारण करण्याव्यतिरिक्त कोणतेही काम नेतेमंडळींनी केलेले नाही. कबनूरला हक्काचे शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी जनतेशी नाळ जोडलेली असणाऱ्या, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील परंतु नागरी प्रश्न सोडवण्याचा अभ्यास आणि अनुभव असणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी केले. कबनूरमधील सिद्धार्थ नगर, आवळे चौक येथे कॉर्नर सभा झाली. चोपडे यांनी कबनूरच्या नागरी सुविधांविषयक प्रश्नांचा आढावा घेतला. कबनूरमधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे.
इचलकरंजीशी संलग्र असणाऱ्या कबनूरचे उद्योग आणि व्यापारातील योगदान तोलामोलाचे असून देखील वाहतूक आणि दळणवळण यंत्रणा सुस्थितीत असावी याकडे आजपर्यंत कोणत्याही आमदाराने लक्ष दिलेले नाही. कबनूरच्या लोकसंख्येचा विचार करता, केवळ लक्षणीय मतदानाकरिता कबनूरचा वापर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
जुजबी विकास कामे करून जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार नेत्यांकडून घडला आहे. त्यामुळेच कित्येक वर्षांपासून इचलकरंजीसारख्या उद्योगनगरीच्या विकासात तोलामोलाचे योगदान असूनही, कबनूरला आजही शहरी रुपडे लाभलेले नाही. कबनूरच्या जनतेने यावेळी कटाक्षाने, माझ्यासारख्या अपक्ष उमेदवाराला निवडून द्यावे. कबनूरचा पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय, आपण स्वस्थ बसणार नाही, असे अभिवचन चोपडे यांनी यावेळी दिले.
कबनूरला जाणीवपूर्वक दुय्यम दर्जावर ठेवणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी, जनतेने सज्ज व्हावे. धर्म आणि विकासाच्या गप्पा मारणाच्या आणि विकासाच्या नावावर जनतेची थट्टा करणाच्या उमेदवारांना झुगारून मला निवडून द्या असे आवाहन चोपडे यांनी केले.