18 तारखेला प्रचाराचा अवधी संपत असून त्याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरात महायुती आणि मविआच्या नेत्यांनी प्रचाराचा, सभांचा धडाका लावला आहे. प्रचार संपायला काहीच दिवस असून त्यापूर्वी राज्यात ठिकठिकाणी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ सुरु असलेल्या पदयात्रांना सर्वच स्तरातून उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावभागातील मख्तुम दर्गा, राणाप्रताप चौक परिसर तसेच लालनगर, नारायणनगर येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रचार पदयात्रा झाल्या. राहुल आवाडे यांनी पदयात्रेत प्रत्येक भाग फिरत मतदारांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतानाच सर्वांनी मतरुपी आशिर्वाद द्यावेत. तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत आवाज उठविण्यासह सर्वच प्रश्नांची निर्गत करण्यासाठी मी कटीबध्द राहिन, अशी ग्वाही दिली.
पदयात्रेदरम्यान भागाभागात महिलांनी राहुल आवाडे यांचे औक्षण करत त्यांना विजयाचे आशिर्वाद दिले. फटाक्यांची आतषबाजी, वाद्यांचा गजर आणि पुष्पवृष्टी अन् युवकांचा उत्साह अशा वातावरणात पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल आवाडे यांनी भविष्यातील राजकीय दृष्टिकोनाबद्दल आणि जिल्हा परिषद सदस्य असतानाच्या कार्यकाळातील प्रगतीच्या योजनांबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे असे आवाहन केले.