इचलकरंजी मतदारसंघात जेवणावळींना ऊत…..

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान होत असून गेले तीन आठवडे धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. भव्य रॅली, पदयात्रा, जाहीर सभांच्या धडाक्यात प्रचाराचा समारोप झाला.आता मतदानापर्यंत छुपा प्रचार चालणार असल्याचे चित्र दिसत आहे. इचलकरंजी विधानसभेचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारांची प्रतिस्पर्ध्यास पिछाडीवर टाकण्याची प्रचंड महत्त्वाकांक्षा दिसून येत आहे.

सभांमधून खालच्या तळाला गेलेले आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. खासकरून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तिगत टीका, बदनामीकारक वक्तव्ये, यामुळे प्रचाराचा स्तर खालावत असल्याचे स्पष्ट होत आहे. ईर्ष्येपोटी उमेदवारांकडून प्रचारात मोठ्या प्रमाणावर मोफत वस्तू, सेवांची आश्वासने आणि रोख स्वरूपातील मदतीची भाषा करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. यामुळे सामान्य मतदार मात्र संभ्रमित आहेत.

इचलकरंजी शहर औद्यागिक क्षेत्रासोबत खवय्येनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. प्रभागातील निवडणुकी दरम्यान शहरातील खानावळी, धाबे, हॉटेल हाउसफुल्ल असतात. मात्र, यंदा विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनल्याने जेवणाची कूपन वाटल्याने रात्रीच्यावेळी शहरातील खानावळी, धाबे, हॉटेल हाउसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळाले.