विधानसभेची उमेदवारी देताना नेत्यांची होणार दमछाक!

लोकसभा निवडणुकीचे वारे शांत होते न होते तोच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली. विधानसभेसाठी अनेकांनी आपापली इच्छा व्यक्त केली. पण विधानसभा निवडणुकीचे तिकीट कोणाला मिळणार अन् कोणाचा पत्ता कट होनार हे आगामी दिवसात कळेलच. लोकसभा निवडणुकीत राज्यभर महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत प्रचंड अस्वस्थता आहे, तर महाविकास आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत उमेदवारी देताना दोन्ही आघाड्यांत नेत्यांचा कस लागणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला महायुती व महाविकास आघाडीच एकत्रित लढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या विजयाने काँग्रेसची बाजू मजबूत झाली आहे.

परिणामी या लोकसभा मतदार संघातील सर्वच मतदार संघांत आता महाविकासच्या उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी शड्डू ठोकण्यास सुरुवात केली आहे. एक-दोन मतदार संघांचा अपवाद वगळता महायुतीतही काही मतदार संघात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरी रोखण्याचे आव्हान नेत्यांसमोर असेल.

सद्य:स्थितीत जिल्ह्यातील दहापैकी चार मतदार संघांत काँग्रेसचे, दोन मतदार संघांत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, एका मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे, तर इचलकरंजी, शिरोळ व पन्हाळा-शाहूवाडीत अपक्ष आमदार आहेत.

अपक्षांपैकी शिरोळचे राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आवाडे आणि जनसुराज्यचे डॉ. विनय कोरे हे सद्य:स्थितीत महायुतीसोबत आहेत. जागा वाटपात या जागा संबंधितांनाच सोडल्या, तर या मतदार संघातील महायुतीतील अन्य इच्छुकांची कोंडी शक्य आहे.

आघाडीत कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर व हातकणंगलेत विद्यमान आमदार काँग्रेसचे असल्याने या जागा त्यांना सोडल्या तर उत्तर, दक्षिण व करवीरमध्ये फारशी बंडखोरी होण्याची शक्यता नाही. पण, हातकणंगलेत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव आवळे यांची भूमिका निर्णायक असेल.