इचलकरंजीतील सहकारनगर परिसरात रंगपंचमीच्या सणादिवशी रंग खेळण्याच्या किरकोळ वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या असून, इचलकरंजी पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. रंगपंचमी दिवशी दुपारच्या सुमारास सहकारनगर येथे भरमा बसाप्पा पाथरवट यांनी आरोपी सिध्दु पाथरवट याला दुकानासमोर रंग खेळू नका असे सांगितले. यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपींनी लोखंडी पाईप आणि काठीने हल्ला करून फिर्यादीच्या पत्नीला जखमी केले.
भरमा पाथरवट यांना उपचारासाठी आय.जी.एम. हॉस्पिटल, इचलकरंजी येथे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच सविता सिध्दाप्पा पाथरवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भरमा पाथरवट यांनी दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या पतीला मारहाण केली. तसेच, लोखंडी पाईपने फिर्यादीच्या मामाच्या हाताच्या बोटांवर वार केला.याशिवाय, महादेवी व रेखा पाथरवट यांनी फिर्यादीच्या केसांना धरून मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून, सविता पाथरवट यांच्यावरही आय.जी.एम. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इचलकरंजी पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पो.नि.महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
