नुकत्याच विधानसभा पार पडलेल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मताधिक्याने विजय मिळवला. निवडणुकीत जेवढे मताधिक्य मिळाले, तेवढे वृक्षारोपण करण्याचा त्यांनी संकल्प केला. सांगोला तालुक्यात यापुढे हुकूमशाही, दादागिरी, गुंडगिरी व भाईगिरी अजिबात चालू देणार नाही.स्व. आबासाहेबांच्या ५५ वर्षांच्या वैचारिक परंपरेनुसार सर्वसामान्य नागरिकांना विश्वास- त घेऊनच राज्यकारभार करु. कोणाची अडवणूक करणे अथवा वेठीस धरण्याचे प्रकार आता चालणार नाहीत.
सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय यापुढे केली जाणार नाही, असा गर्भित इशारा नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला आहे. शनिवारी मुंबईहून त्यांचे सांगोल्यात आगमन होताच त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्त्यांनी हारतुरे ऐवजी रोपे देऊन आम.डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना नुतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख पुढे म्हणाले की, तुमचा पाठिंबा आणि विश्वास हीच माझी ताकद आहे.
जनतेच्या भल्यासाठी काम करणे, हेच माझे ध्येय असून, भविष्यातही मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन. आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या, असे आवाहन करत निवडणुकीत मिळालेल्या यशाने आम्ही कधीही हुरळून जाणार नाही,असे सांगत आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबध्द राहीन, अशी ग्वाहीही आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी दिली. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जावू देणार नाही.
तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून आता जबाबदारी वाढली आहे. सर्वच गावांमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे, माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून आम्हाला इथून पुढे अधिक बारकाईने काम करावे लागेल. आम्ही जनतेच्या ऋणात राहू इच्छितो. जनतेच्या विश्वासाला तडा जावू दिला जाणर नाही, अशी खात्रीही आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.