मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या इस्लामपूर मतदारसंघात ना फटाक्यांचे आवाज, ना गुलालाची उधळण, ना जल्लोष. या उलट आ. पाटील यांचे मूळगाव कासेगावचा समावेश असलेल्या शिराळा मतदारसंघामध्ये भाजपचा जोरदार जल्लोष सुरू होता. आ. पाटील यांचा गेल्या सात निवडणुकांमध्ये झालेला दणदणीत विजय आणि यावेळी झालेला निसटता विजय आणि शिराळ्यातील पराभव जिव्हारी लागणारा ठरला आहे. पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत आ.पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी राज्यातील सर्वोच्च जबाबदारी या तालुक्याला देण्याचे सूतोवाच झाले.
प्रचारादरम्यान, खा. अमोल कोल्हे यांनीही राज्याचे नेतृत्व आ. पाटील यांच्या हाती सोपवले जाऊ शकते यामुळे जास्तीत जास्त आमदार जिल्ह्याने द्यावेत, असे आवाहन केले होते. यामुळे वाळवेकरांना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली होती.कमी अधिक होत होत अखेरच्या फेरीत आमदार पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत असताना लाखाचे मताधिक्य सांगण्याची सवय असलेल्या वाळवेकरांची जीभ अवघे १३ हजार २६३ चे मताधिक्य सांगताना अडखळू लागली. यामुळे मिळालेला विजयाचा आनंदही साजरा करता येईना झाला आहे.
शेजारी असलेल्या शिराळा मतदारसंघात आ. पाटील यांचे वर्चस्व असलेली ४८ गावे समाविष्ट आहेत. तरीही भाजपला या ठिकाणी २२ हजार ६२४ मतांची आघाडी मिळाली. निवडून आलेले भाजपचे सत्यजित देशमुख हे आ. पाटील यांचे साडू असले तरी त्यांची नाळ आता भाजपशी जोडली गेली आहे. इस्लामपुरातील प्रचाराची धुरा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील व राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार पुत्र प्रतीक पाटील यांच्या हाती असतानाही अल्प मतातील विजय इस्लामपूरकरांना पचणारा निश्चितच मानता येणार नाही.