राजू शेट्टी अचानक ‘मातोश्री’वर……….

लोकसभा निवडणुकीला अवघे तीन महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीची आपआपल्या मित्र पक्षासोबत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीचंही जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीकडून प्रत्येकी एक जागा दिली जाणार असल्याची चर्चा आहे. ही चर्चा सुरू असतानाच आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून उभे राहणार असल्याची माहिती आहे. पण राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून उभं राहावं असा आघाडीचा प्रयत्न आहे. खासकरून ठाकरे गटाचा तसा प्रयत्न आहे. त्यावर उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

राजू शेट्टी यांना हातकणंगलेमधून उमेदवारी देण्याचा उद्धव ठाकरे गटाचा आग्रह आहे. सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात असलेले खासदार धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या आग्रहाखातर राजू शेट्टी यांना ही जागा मिळू शकते. पण राजू शेट्टी हे एकाच जागेवर समाधानी होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राजू शेट्टी एकाच जागा घेण्यास तयार झाले तर त्यांचा इंडिया आघाडीत येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.