हातकणंगले मतदारसंघात अशोकराव माने, आ. राजू आवळे आणि माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात तिरंगी लढत होईल, अशी चर्चा असतानाच निकालादिवशी मात्र एकतर्फी विजय हा अशोकराव माने यांनी मिळवला. विधानसभा निवडणुकीमुळे तालुक्याच्या राजकारणात महायुती आणि घटक पक्षच्या एकजुटीने नवी राजकीय समीकरणे उदयाला आली आहेत. अपयशाने खचून न जाता पाच वर्षे मतदारसंघात संपर्क ठेवून जनसुराज्यचे अशोकराव माने यांनी चार पक्षाची एकसंघ मोट बांधून विजय मिळवला.
महाविकास आघाडी कागदावरच भक्कम होती, प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे नेते प्रचारात नव्हते. काँग्रेसच्या राजूबाबा आवळे यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर एकाकी झुंज देत विकासाच्या मुद्दावर निवडणूक लढवली. मात्र, नियोजनातील चूक व प्रमुख कार्यकर्त्यांची वाणवा असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. हातकणंगलेची मतदारसंघाची निवडणूक असली तरी निवडणुकीचा केंद्रबिंदू अंबप गाव ठरले. जनसुराज्य शक्तीच्या जोडण्या विजयसिंह माने यांच्याकडे होत्या. तर काँग्रेस पक्षाच्या जोडण्या राजवर्धन पाटील हे लावत होते. या दोन नेत्यांमधील टोकाची स्पर्धा यावेळी पाहावयास मिळाली. निवडणूक आमदारकीची आणि हालचालीचे केंद्र मात्र अंबप असे चित्र होते.
आवाडे गटाच्या जुन्या मतदारसंघातील १३ गावांमध्ये २०१९ला अशोकराव माने यांना ६९०० मते मिळाली होती. यावेळी १३ गावांत ४०७१८ इतकी मते मिळाली. या १३ गावातून १७२२७ चे मताधिक्य मिळाले. प्रकाश आवाडे यांच्या दमबाजीने काम हे काम फत्ते झाले. राजूबाबा आवळे यांचे गणित या १३ गावांमध्येच फसले.