विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी सर्व आस्थापना व कारखान्यांतील कामगारांना २० नोव्हेंबर रोजी सुटी जाहीर केली आहे.त्याची अंमलबजावणी सर्व आस्थापना, कारखाने, दुकानदार यांनी करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, कामगार अधिकारी यांच्या उपस्थितीत एमआयडीसी, पॉवरलूम, प्रोसेसिंग, पेट्रोल पंप, मेडिकल, बांधकाम क्षेत्र, हॉटेल, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, आदी क्षेत्रांतील कामगारांना पगारी सुटी जाहीर करण्याबाबत बैठकीचे आयोजन केले होते.
सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या कार्यकक्षेत शिरोळ व हातकणंगले या दोन तालुक्यांचा समावेश आहे. शहर व आसपासच्या परिसरात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी येथे कामगार वर्गाची संख्या लक्षणीय आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी. ही सुटी साप्ताहिक सुट्टी रद्द करून देऊ नये. याबाबत ज्या आस्थापना कर्मचाऱ्यांना सुटी अथवा सवलत देत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करू, असा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.