हातकणंगले मतदारसंघात अशोकराव माने, आ. राजू आवळे आणि माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात तिरंगी लढत होईल, अशी चर्चा असतानाच निकालादिवशी मात्र एकतर्फी विजय हा अशोकराव माने यांनी मिळवला. विधानसभा निवडणुकीमुळे तालुक्याच्या राजकारणात महायुती आणि घटक पक्षच्या एकजुटीने नवी राजकीय समीकरणे उदयाला आली आहेत. अपयशाने खचून न जाता पाच वर्षे मतदारसंघात संपर्क ठेवून जनसुराज्यचे अशोकराव माने यांनी चार पक्षाची एकसंघ मोट बांधून विजय मिळवला.
महाविकास आघाडीचे शेवटच्या दोन दिवसातील नियोजन चुकल्याने कार्यकर्ते नाराज झाले. उद्धवसेनेचे मोजके निष्ठावंत शिवसैनिक सोडले तर इतरांनी काँग्रेसला साथ दिली नाही. शरद पवार गटाची भक्कम साथ मिळाल्याचे जाणवले नाही. काँग्रेस पक्षाने विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढली. आमदार राजूबाबा आवळे गावागावांमध्ये अनेक विकासकामे केली. विविध समाजांना निधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी केलेली विकासकामे पटवून देण्यात स्थानिक कार्यकर्ते कमी पडले.
काँग्रेसचे राजू बाबा आवळे यांना ५७ पैकी किणी, नरंदे, आणि माणगांववाडी या तीन गावांत मताधिक्य मिळाले. मात्र ते ही नगण्य होते. स्वाभिमानीच्या डॉ. सुजित मिणचेकर यांना ११ गावात तीनअंकी मते देखील मिळाली नाहीत. हिंगणगांव आणि मजले या दोन गावात त्यांना काँग्रेसपेक्षा जास्त मते मिळाली. त्यांच्या मिणचे गावातही त्यांना तिसऱ्या नंबरची मते मिळाली.