सांगोला विधानसभा मतदारसंघात यावेळच्या निवडणुकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील व दीपकआबा साळुंखे- पाटील दोघेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये तर शेकापकडून डॉ. बाबासाहेब देशमुख उभे राहिले होते. यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली आहे. दोन्ही आजी-माजी आमदारांच्या मतविभाजनाचा फायदाही शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारास झाल्याचे चित्र दिसून आले. या निवडणुकीमध्ये गेल्यावेळी एकत्र असलेले आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील हे या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षांकडून रिंगणात उतरले. निवडणूकपूर्व काळामध्ये दोन्ही नेते एकत्र येण्यासाठी वरिष्ठ पातळी बरोबरच स्थानिक पातळीवरही बरीच चर्चा झाली होती.
दोघेही निवडणुकीत उतरले तर याचा फायदा विरोधकांना होईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु शेवटी दोन्ही आजी-माजी आमदारांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना एक लाख १६ हजार २५६ मते मिळाली तर दोन्ही आजी-माजी आमदारांची मते एकत्रित केल्यास एक लाख ४१ हजार ८३२ एवढी होतात. दोघे एकत्रित लढल्यास चित्र वेगळे दिसले असते, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. काहींनी तर ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा आशयाच्या पोस्टही काही जणांनी केल्या. परंतु राजकारणात ‘जर-तर’ला काहीही अर्थ नसतो, असे अनेक जाणकारांनी बोलूनही दाखवले.