आ. जयंत पाटील यांना निसटता विजय जिव्हारी; विजय होवूनही निराशा

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना १ लाख ९ हजार ८७९ तर निशिकांत पाटलांना ९६ हजार ८५२ इतकी मते मिळाली. निशिकांत पाटील यांच्यावर १३ हजार २७ मतांनी निसटता विजय नोंदवला. लाखांचे मताधिक्य मिळवू असे सांगणाऱ्या जयंत पाटील समर्थकांना विजय होवूनही निराशा लपवता आली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील अष्टावधानी आमदार ठरले. परंतु अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत सप्तपदी आमदार असणाऱ्या जयंत पाटील यांना आठव्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी अखेरपर्यंत दिलेली कडवी झुंज लक्षवेधी ठरली.

पहिल्यांदाच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात एकास एक लढत झाल्याचा फायदा झाला. पण तो विजयापर्यत नेता आला नाही. याची खंत सर्व जयंत पाटील विरोधकांना लागून राहिली. आतां नाही तर पुन्हा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. निशिकांत पाटील यांनी दिलेली कडवी झुंज अपयशी ठरल्याने कार्यकर्ते नाराज झाले.  जयंत पाटील यांचे पूर्वाश्रमीचे राजकारणातील सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशिकांत पाटील यांना भाजप पक्षातून आपल्या पक्षात घेत उमेदवारी दिली.

गेल्या पाच निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे जयंत पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांवर निवडणूक लढवली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या विजयासाठी सभांसाठी धडका लावला होता. लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळाल्याने आतां विधानसभेत विकास आघाडीला पुन्हा सत्तेत आणू असा विश्वास व्यक्त केला जात होता. शरद पवारांनी  इस्लामपुराच्या सभेत जयंत पाटील यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सांगितले होते. यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह वाढला होता. पण आठव्या निवडणुकीत जयंत पाटील यांना निशिकांत पाटील यांनी विजयासाठी चांगलेच झुंजवले.
 

याउलट जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना अति आत्मविश्वास नडला. आमचे साहेब गत निवडणुकीत ७२ हजारांनी विजयी झाले होते. यंदा ५० हजार मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा ठेवत होते. पण प्रत्यक्षात प्रचार यंत्रणेत कमी होते. परिणामी मताधिक्य घटले. याचा परिणाम तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात असणाऱ्या व त्यात १५ वर्षे मंत्री म्हणून कामकाज पाहिलेल्या जयंत पाटील यांना सर्वच पातळीवर आत्मपरीक्षण करायला लागणार आहे.