इचलकरंजी महापालिकेच्या श्रीमंत घोरपडे नाट्यगृहाची पुन्हा एकदा दर्जेदार बांधणी केली जाणार आहे. त्यासाठी मुंबई, पुणे व पणजी येथील नाट्यगृहातील सुविधांचा महापालिका प्रशासनाकडून अभ्यास केला जाणार आहे. त्या धर्तीवर घोरपडे नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने यापूर्वीच ८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम नाट्यगृह साकारणार आहे. सध्या श्रीमंत घोरपडे नाट्यगृहातील बहुतांशी यंत्रणा कालबाह्य झाली आहे. आसन व्यवस्था सुलभ नसल्यामुळे प्रेक्षकांना कार्यक्रमांचा व्यवस्थित आनंद घेता येत नाही. मेकअप रूममधील फर्निचर खराब झाले आहे. रंगमंचाची दुरवस्था झाली आहे. वातानुकूलीत यंत्रणेत सुधारणा करणे आवश्यक आहे.
या गैरसोयीचा त्रास कार्यक्रमांच्या संयोजकांसह कलाकार व प्रेक्षकांनाही होत होता. त्यामुळे नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाची मागणी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठविला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ७ कोटी ९९ लाखांचा विशेष निधी यासाठी राज्य शासनाने मंजूर केला होता. १२०० आसन क्षमता असणारे हे परिसरातील एकमेव नाट्यगृह आहे.
या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाची निविदा लवकरच काढली जाणार आहे; पण नूतनीकरण करताना नाट्यगृहातील काम दर्जेदार व सर्वोत्तम होण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. यासाठी पणजी, पुणे व ठाणे येथील नाट्यगृहांची पाहणी केली जाणार आहे. तेथे असलेल्या सुविधांची माहिती घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने घोरपडे नाट्यगृहात सुविधा दिल्या जाणार आहेत.