शिवनाकवाडीतील रुग्णांसह नातेवाईकांसाठी भोजनाची व्यवस्था, प्रशासनासह आ. राहुल आवाडे यांचा पुढाकार

वस्त्रनगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळतो. शिवनाकवाडी (ता. शिरोळ) यात्रेदरम्यान महाप्रसादातून विषबाधा झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. तेथील म कोठ्या प्रमाणातील रुग्ण उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालयातील अपुऱ्या स्टाफवर मोठा ताण आला होता. मात्र रुग्णालय प्रशासनाने तो ताण जाणवू न देता तातडीची यंत्रणा राबवत येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आवश्यक ते उपचार उपलब्ध करुन दिले.

तरीही दाखल रुग्णांची संख्या पाहता काही साहित्याची गरज भासत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर आमदार राहुल आवाडे त्याचबरोबर शहरातील काही सामाजिक संघटनांनी आवश्यक ते साहित्य व औषधे उपलब्ध करुन दिले.  उपचार घेत असलेल्या रुग्णांना आरोग्य विभागाच्यावतीने ५ फेब्रुवारी, ६ फेब्रुवारी रोजी २८३ आणि ७ फेब्रुवारी रोजी सुमारे ४०० रुग्णांना उपीट व मुगडाळ खिचडी आणि लहान मुलांना दहीभात देण्यात येत आहे. याशिवाय रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेत आमदार राहुल आवाडे यांनी जवळपास ३०० नातेवाईकांसाठी शुक्रवारपासून दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करुन दिली आहे. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांतून रुग्णालय प्रशासन आणि आमदार राहुल आवाडे व मदतीचा हात देणाऱ्या संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. हा सर्व आहार रुग्णालयातील आहारतज्ञ माधवी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जात आहे.

वस्त्रनगरी इचलकरंजीवर एखादे संकट ओढवले की त्या संकटाला थोपविण्यासाठी मदतीचे लाखो हात सरसावतात. याची प्रचिती शिवनाकवाडी येथील विषबाधा घटनेवेळी दिसून आली. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागाच्यावतीने, तर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आ.राहुल आवाडे यांनी स्वखर्चातून जेवणाची व्यवस्था करुन दिली आहे.