पंचतारांकित औद्योगिक वसाहती मधील सिल्वर झोन येथील रस्त्यावर समोरून येणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तरुण जागीच ठार झाला. या घटनेची हुपरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.सुनील पुरंदर गाट (वय ४८वर्ष रा. सिल्वर झोन हुपरी) असे अपघातामध्ये ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष असून जि.प. माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांचे पुतणे आहेत.
याबाबत पोलीस ठाण्यातून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रजत एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुनील पुरंदर गाट हे आपल्या कुटुंबासह पंचतारांकित औद्योगिक वसाहत मधील सिल्वर झोन या ठिकाणी वास्तव्यास आहेत. ते हुपरी मधून आपल्या घरी सिल्व्हर झोनकडे मेन रस्त्याने मोटारसायकलीने जात असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला चुकवून जात असताना समोरून वेगाने येणाऱ्या टेंपोने जोराची धडक दिल्याने रक्तबंबाळ होऊन जागीच ठार झाले. ताबडतोब त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले मात्र त्या ठिकाणी पी. एम. करण्याची सोय नसल्याने इचलकरंजी येथील आय. जी. एम.रुग्णालयात दाखल करण्यात आले .
सुनिल पुरंदर गाट हे हुपरी शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नावारूपाला आलेल्या रजत एज्युकेशन सोसायटी या शाळेचे व्हाईस चेअरमन होते. घरी आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सिल्व्हर झोन या कॉलनीत दुःखाचे सावट पसरले असून हळहळ व्यक्त होत आहे.