शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथील विषबाधा परिस्थिती नियंत्रणात आली आहे. विषबाधा प्रकरणातील येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून शनिवार दुपारपर्यंत आजअखेर ५८ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. तर अद्याप १४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जवळपास १००० पेक्षा अधिक जणांना विषबाधेचा त्रास होऊ लागला. आसपासच्या गावासह बाधित रुग्णांना इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे २०० पेक्षा अधिक रुग्णांवर याठिकाणी उपचार करण्यात आले.
रुग्णालय प्रशासनाने तत्परता दाखवत केलेल्या उपचारांमुळे बहुतांशी रुग्ण उपचारानंतर घरी परतत आहेत. शनिवार ता.८ रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ६४ जणांची फेर तपासणी करण्यात आली असून, दोन रुग्णांना अधिक उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने परिस्थिती हाताळण्यात यश आले आहे.