राज्यातील विधानसभा निवडणूका पार पडल्या. 23 नोव्हेंबर ला निकाल हाती आला. महायुतीने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. विधानसभेच्या निवडणुकीत आमदार राहुल आवाडे यांच्या दणदणीत विजयानंतर इचलकरंजी शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चुरस सुरू झाली आहे. विजय रॅलीच्या उत्साहात शहरभर “भावी नगरसेवक” असे लिहिलेले फलक झळकत होते. हे फलक आणि समर्थकांचा जल्लोष पाहता आगामी निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये इच्छुकांनी मतदारांशी संपर्क साधण्याचे अभियान जोरात हाती घेतले आहे. सामाजिक कार्यक्रम. मंडळांच्या पुढाकारातून जनतेमध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे.
निवडणूक जवळ येताच ही चढाओढ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. काहींनी विकासकामांची मोठी आश्वासने देत आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी कार्यकत्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला आहे. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विकासकामे, पायाभूत सुविधा, आणि जनतेचे प्रत्यक्ष प्रश्न हे प्रमुख मुद्दे ठरण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी आतापासूनच रणनीती आखत जनतेला भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकांमुळे इचलकरंजी शहरात राजकीय रंगत अधिक बादली असून मतदारांमध्येही उत्सुकता दिसून येत आहे. भागाभागातील इच्छुक उमेदवारांकडून आता मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.