नवीन वर्षात उडणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा

विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात भरभरून मतदान झाले. महायुतीची त्सुनामी आली. विधानसभा निवडणुकीत विकासाच्या घोषणांचा पाऊस पडला. आता येणार्‍या काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा नव्या घोषणांचा पाऊस पडणार आहे. पुढचे वर्ष हे कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकांचेच वर्ष असेल.भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मार्चपूर्वी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

या निवडणुका कधी होणार, हे अद्याप स्पष्ट नसले, तरी कार्यकर्त्यांना कायम तयार राहावेच लागते. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला, तर कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लागतील. आता जिल्ह्यातील एक हजार पैकी 463 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत; तर पुढीलवर्षी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गोकुळच्या निवडणुका होणार असल्या तरी ठराव दाखल करण्यातून होणारे शक्तिप्रदर्शन राजकीय ताकद दाखविणारे ठरणार आहे. त्याशिवाय सहकारी बँका व सहकारी संस्थांच्याही निवडणुका नवीन वर्षात असणार आहेत.