विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांना विधानसभेत रेवणगाव परिसरानेही मताधिक्य देऊन त्यांना विजयी करण्यात हातभार लावला. खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार सुहास बाबर यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन सुहास बाबर विजय संपादन केल्याबद्दल खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील ग्रामसभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला. सरपंच सचिन मुळीक सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी टेंभू योजनेच्या माध्यमातून दुष्काळी खानापूर मतदारसंघात हरितक्रांतीचे पर्व सुरू केले. खानापूर घाटमाथ्यावरील रेवणगाव, रेणावीसह वंचित गावांना टेंभूचे पाणी देण्यासाठी पाठपुरावा केला. टेंभूच्या सहाव्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी मिळवून घेतली. त्याच्या पश्चात सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
रेवणगाव येथे बुधवारी सरपंच मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी आमदार बाबर यांच्या अभिनंदनाचा ठराव शशिकांत मुळीक यांनी मांडला. तो सर्वानुमते मंजूर केला. यावेळी सदस्य संपत गुजले, स्वप्नाली मुळीक, अनिता बेले, शशिकांत मुळीक, शहाजी मुळीक, सोसायटीचे अध्यक्ष वैभव मुळीक, अर्जुन मुळीक, सागर बेले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.