हातकणंगलेचे नूतन आमदार अशोकराव माने यांनी कोल्हापूर कार्यालयाला भेट दिली.आता वाढती बेरोजगारी हे समाजातील मोठे आव्हान आहे. मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीत नवनवे उद्योग आणून, त्याद्वारे बेरोजगारी कमी करण्याला आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही हातकणंगलेचे नूतन आमदार अशोकराव माने यांनी दिली.
ते म्हणाले, बेरोजगारी आणि महागाई हे ज्वलंत प्रश्न आहेत. आमदार निधीसह गावांना मिळणाऱ्या निधीतून गटारी आणि रस्त्याची कामे होतील. त्यापेक्षा बेरोजगारी कमी करायची असेल तर नवे उद्योजक तयार करावे लागतील; पण अशा नव उद्योजकांना बँका कर्ज देत नाहीत, जागा मिळत नाही. जागा असेल तर ती बिगरशेती करण्यात अडचणी आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी शासनाच्या पातळीवर नव उद्योजकांना सहकार्य मिळाले पाहिजे.
ते म्हणाले, ‘सहकारात चांगले काम केल्याचा फायदा या विधानसभेच्या निवडणुकीत झाला. मी स्वतः एक सूतगिरणीचा संस्थापक आहे. एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न आहे. तर दुसरीकडे कुशल मनुष्यबळ मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. माझ्याच सूतगिरणीत आम्हाला परराज्यातील कामगार आणावे लागातात. अतिशय कमी पगाराता इंजिनिअरिंग झालेले तरुण औद्योगिक वसाहतीत राबतात. शासनाच्या बेरोजगारासांठीच्या असलेल्या योजनाही याला कारणीभूत आहेत. त्यापेक्षा तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.